मुरुड परीसरात दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडच्या नगरपरिषद हद्दीतील दत्तवाडी व प्राथमिक शाळा परीसरात दुर्गंधी युक्त सांडपाणी रहदारीच्या रस्त्यावर येत आहे. त्यामुळे येथील रहिवासी व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील कवडी येथील मुरूड नगरपरिषद शाळा क्र.5 च्या बाजुला काटे अपार्टमेंट ही रहिवासी इमारत आहे. या इमारतीमध्ये 22 रहिवाशी फ्लॅट असून त्या इमारतीमध्ये अंदाजे 100 लोक राहतात. परंतु, या इमारतीचे बांधकाम करते वेळी अपुरा शौचखड्डा (टाकी) बांधण्यात आल्याकारणाने शौचालयातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरून तसेच शाळेजवळ असलेल्या गटारातून वाहते. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून याचा रहिवाशांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागला आहे. तसेच, या भागांत डासांचा प्रार्दुभाव होऊन वेळप्रसंगी डेंग्यूसारख्या घातक रोगाची व साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यांत या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपरिषद कार्यालय तसेच संबंधीत आरोग्य व्यवस्थेची राहील, याची कृपया नोंद घ्यावी, असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे 15 दिवसांत कारवाई न केल्यास या विरोधात दत्तवाडी रहिवाशांकडून आंदोलन छेडण्यांत येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषदेची राहील, असे देखील निवेदन देतेवेळी मुख्याधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी संजय फुलमाळी, विजय वाणी, विजय सुर्वे, संतोष वाणी, विजय गुरव, रोहित जमादार, उल्हास विरकुड, निलेश खामकर, अशोक भुसाणे, मंगेश मोहिते, प्रवीण भायदे, देवेंद्र गुरव, नारायण नांदगावकर, विरेंद्र भगत, मंदार बाक्कर उपस्थित होते.

Exit mobile version