| मुंबई | प्रतिनिधी |
चर्चगेटहून विरारला जाणारी एसी लोकल सोमवारी दुपारी 2.53 वाजता नियोजित वेळेवर रवाना झाली. ही लोकल बोरिवली ते कांदिवलीदरम्यान 3.38 वाजता दाखल होताच रेल्वे रुळांवरून एका तरुणाने या लोकलच्या दिशेने दगड भिरकावला.
एसी लोकलच्या खिडक्यांमध्ये दुहेरी काच असल्याने हा दगड दोन्ही काचांमध्ये अडकला. यामुळे डब्यातील प्रवाशांना काहीच दुखापत झाली नाही. मात्र अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बायकोशी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात धरून एका तरुणाने कांदिवली स्थानकात एसी लोकलवर दगडफेक केल्याचे हल्लेखोराने सांगितलं. रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी एक तरुण रुळांवरून जात असल्याचे त्यांना दिसले. आरपीएफने त्याची चौकशी करताच त्याने याबाबत कबुली दिली. घरात बायकोशी झालेल्या भांडणातून आधी स्वत:ला दगडाने मारून घेतले, त्यानंतरही राग शांत होत नसल्याने एसी लोकलवर दगड फेकला, असे त्याने सांगितले.