। सोलापूर । वृत्तसंस्था ।
सोलापुरातील महाविकास आघाडीतील वाद संपता संपेना असे चित्र आहे. सोमवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला आघाडीचा धर्म पाळण्याचा इशारा दिलेला असतानाच काँग्रेस आणि डाव्या पक्षातील मतभेदाने टोक गाठले.
शहर मध्य मतदारसंघात काँग्रेससह माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम हेही उमेदवार असून आघाडीतील वादातून त्यांच्या घरावर दगडफेकीचा प्रकार घडला. हे कृत्य प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करत आडम यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चेतन नरोटे, भाजपचे देवेंद्र कोठे, एमआयएम पक्षाचे फारुख शाब्दी आणि माकपचे अनुभवी नेते नरसय्या आडम यांच्यात चौरंगी लढत होत आहे. डाव्या आघाडीकडून या जागेची मागणी होत होती. मात्र, ती न सुटल्याने डावे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तणावाचे वातावरण आहे. यात आडम यांनी नुकताच खासदार प्रणिती शिंदे यांनी आपला केसाने गळा कापल्याचा आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना रात्री लष्कर भागातील बापूजी नगरात आडम यांच्या घरावर अचानकपणे दगडफेक झाली. हे कृत्य काँग्रेसच्या आठ कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आडम यांनी केला आहे. दगडफेक का केली, असे विचारत असताना संबंधित समाजकंटकांनी आडम कुटुंबीयांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोपही आडम यांनी केला आहे.