परप्रांतियांकडून महिलांवर दगडफेक

धोकवडे येथील घटना, ग्रामस्थ आक्रमक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मांडवा बंदराचा विकास होत असताना परिसरातील गावांमध्ये मोठ मोठे बंगले, इमारती उभ्या राहात आहेत. या ठिकाणी काम करण्यासाठी परप्रांतियांचा लोंढा वाढू लागला आहे. मात्र, याच परप्रांतियांकडून महिलांची छेडछाड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे धोकवडे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, बुधवारी ग्रामसभा घेऊन विकासकासह परप्रांतियांवर कारवाई करण्यात यावी, जोपर्यंत विकासक माफी मागत नाही, तोपर्यंत इमारतीचे काम होऊ देणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

धोकवडे गावातील मध्यवर्ती ठिकाणी एक भले मोठे जुने तलाव आहे. या तलावाच्या शेजारी एक चौदा मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीचे काम करण्यासाठी परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आले आहेत. गावात उभ्या राहात असलेल्या एका चौदा मजली इमारतीच्या शेजारी असलेल्या तळ्यावर स्थानिक महिला रोज कपडे धुण्यासाठी येतात. काही दिवसांपूर्वी महिला कपडे धुवत असताना चार ते पाच परप्रांतीय कामगारांनी त्यांची छेड काढली. त्यांना त्यावेळी महिलांनी जाब विचारला, त्या कामगारांनी त्यांच्यावर दगडफेक केली.

या प्रकाराबाबत महिला सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परप्रांतीय कामगारांच्या या गैरप्रकाराबाबत धोकवडे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. मांडवा सागरी पोलीस ठाण्यात त्या कामगारांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. परंतु, मांडवा पोलिसांनी तात्पुरता स्वरुपात कारवाई करून त्या कामगारांना पुन्हा सोडून दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन परप्रांतियांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
परप्रांतियांच्या या प्रकाराबाबत बुधवारी सकाळी धोकवडेमध्ये ग्रामसभा बोलावण्यात आली. या सभेमध्ये हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. या बैठकीत विकासक राजेश भास्कर यांना बोलावण्यात आले होते. कामगारांना सर्वांसमोर माफी मागण्यास सांगावी, ही ग्रामस्थांची भूमिका होती. मात्र, विकासक बैठकीला आले नसल्याने या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. विकासक यांना बोलावण्यात यावे, कामगारांना माफी मागण्यास सांगावे अन्यथा इमारतीचे काम बंद ठेवण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

कामगारांना पोलिसांचा अभय
मागील काही महिन्यांपूर्वी उसर येथील गेल कंपनीत कामाला आलेल्या एका परराज्यातील कामगाराने तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर धोकवडे येथील महिलांची छेडछाड करण्याचा प्रकार परराज्यातील कामगारांकडून झाला. त्याबाबत मांडवा पोलिसांनी कठोर कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विकासकासह गैरप्रकार करणार्‍या परप्रांतीय कामगारांना पोलिसांचा अभय असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे

धोकवडे येथील महिलांची छेडछाड करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या ग्रामसभेत नागरी सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही लावणे, कामगार व भाडेकरू संशयित यांची माहिती पोलिसांनी देणे, ग्राम रक्षक दल स्थापन करणे आदी सूचना देण्यात आली आहे.

दिपक भोई,
सहाय्यक पोलीस निरीक्षक,
मांडवा सागरी

Exit mobile version