वाडगावमधील बेकायदा उत्खनन थांबवा- आ. जयंत पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथील सरपंच सरिता भगत यांचे पती जयेंद्र भगत बेकायदा उत्खनन करीत असून त्यामुळे संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली आहे. याबाबत तक्रार करुनही तहसिलदार, प्रांत तसेच जिल्हाधिकार्‍यांनी अद्यापही कारवाई केली नसल्याचे शेकापचे आ. जयंत पाटील यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. तसेच याबाबत सरकार काय कारवाई करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत सोमवारी (दि.22) सभागृहात ते बोलत होते.

यापुढे आ. जयंत पाटील यांनी ग्लोबल वॉर्मिंगच्या गंभीर विषयाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले. ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वाधिक परिणाम हा रायगड जिल्ह्यावर होण्याची शक्यता असून याला प्रामुख्याने जिल्ह्यातील केमिकल झोन कारणीभूत असल्याची बाब आ. भाई जयंत पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली.

याशिवाय गेल्या तीन वर्षांत चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी देखील अतिवृष्टीमुळे परिसरातील नारळ आणि सुपारीच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु दुर्दैवाने पाहणी केल्यानंतर एका रुपयाचीही मदत अद्याप करण्यात आली नाही. याच पार्श्‍वभूमीवर आ. जयंत पाटील यांनी गेल्या वर्षी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानासाठी विद्यमान राज्य सरकार निधीची तरतूद करणार का? तसेच झालेल्या नुकसानासंदर्भात राज्य सरकार आढावा बैठक घेणार का, असा प्रश्‍नदेखील त्यांनी उपस्थित केला.

रायगड कधी समृद्ध होणार?
रायगड आणि कोकणातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ग्रामीण भागातील रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी आ. भाई जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली. आज नागपूरमध्ये समृद्ध महामार्ग होत आहे. तिकडच्या रस्त्यांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. पण रायगड जिल्ह्यातील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा समृद्ध कधी होणार, असा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला.

सरकारचे आश्‍वासन कागदावरच
नियमित कर्जफेड करणार्‍यांना 50000 रुपये देण्याचे आश्‍वासन सरकारद्वारा देण्यात आले होते. ते अद्यापही पुर्ण करण्यात आले नाही. याशिवाय चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नुकसान झाले. त्यावेळी तत्कालिन सरकारने नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. मात्र ते आश्‍वासनही कागदावरच राहिले. त्यामुळे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करुन नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची विनंती आ. जयंत पाटील यांनी शासनाला केली.

शासनाकडे माहितीची मागणी
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार भविष्यात किती अतिवृष्टी होण्याची शक्यता असू शकते, आणि त्यामुळे शेतीचे किती नुकसान होऊ शकते? याची माहिती आ. भाई जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे मागितली. याबरोबरच, राज्याच्या मदत व पुनवर्सन विभागाला केंद्र सरकारकडून किती निधी देण्यात आला व त्याचा कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती वाटप करण्यात आला? त्यामध्ये राज्य शासनाचा किती हिस्सा होता, याची माहिती देण्याची मागणीही आ. जयंत पाटील यांनी केली.

संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करा
वाडगावमध्ये बेकायदा उत्खनन सुरु असून धोकादायक डोंगरांवरून दरड कोसळू शकते. त्यामुळे डोगंराच्या पायथ्याशी वसलेल्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. परिणामी, त्याठिकाणी उत्खनन केले जाऊ नये. याशिवाय बेकायदेशीर उत्खननावर बंदी न घालणार्‍या तहसिलदार, प्रांत तसेच जिल्हाधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणीही आ. जयंत पाटील यांनी शासनाकडे केली.

Exit mobile version