सिडको अतिक्रमण पथकाला मज्जाव

ओवळे गावातील कारवाई महेंद्र घरत यांनी रोखली

| उरण | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ओवळे या गावातील बहुतांश ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सिडकोने अतिक्रमणाची कारवाई करण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा हा प्रयत्न सिडकोच्या माध्यमातून करण्यात आला. प्रत्येक वेळी ही कारवाई रोखण्याचे काम रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले आहे.

सिडको अधिकारी पोलिसांचा फौज फाटा घेऊन ओवळे ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाईसाठी आले असता महेंद्र घरत यांनी आपल्या सहकार्‍यांना घेऊन कारवाई रोखण्यामध्ये यश मिळविले. ज्याप्रमाणे दि बा पाटील साहेब यांनी अनेक नागरिकांना संघर्ष करून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्याप्रमाणे आज ओवळे गावात सिडकोचे अतिक्रमण पथक आले असल्याची बातमी महेंद्र घरत यांना समजली. त्यांनी तात्काळ कारवाईच्या ठिकाणी पोहोचत कारवाई रोखण्यास भाग पाडले. यावेळी त्यांनी उपजिल्हाधिकारी श्री. डावरे यांच्यासोबत वाटाघाटी करून सिडकोचे एमडी, जेएमडी यांच्याशी फोन वरून संपर्क साधून कारवाई स्थगित करण्यास भाग पाडले.

यावेळी पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष नंदराज मुंगाजी, अमित मुंगाजी, सरपंच रेश्मा मुंगाजी, नंदकुमार गायकवाड, पनवेल तालुका इंटक अध्यक्ष भरत गायकवाड, दयानंद म्हात्रे, सुनील पाटील, गजानन म्हात्रे, ललिता म्हात्रे व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ही कारवाई थांबवण्यासाठी उपस्थित होते.

Exit mobile version