कार्यकारी अभियंता यांना निवेदन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहराजवळील तवसाळकर रस्त्यावरील सुरू असलेल्या मोरीच्या बांधकामात त्रुटी असल्याचा आरोप करत हे काम तातडीने थांबवून नव्याने अंदाजपत्रक तयार करावे, अशी मागणी नगरसेविका प्रांजली मकु यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले असून, ते मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रुतिक घोडेस्वार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तवसाळकर रस्त्यावरील मोरीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असून, तिची रुंदी व खोली अपुरी ठेवण्यात येत आहे. तसेच मोरीची उंचीही विद्यमान डांबरी रस्त्याच्या तुलनेत जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. नवीन मोरी ही जुन्या मोरीपेक्षा अरुंद बांधली जात असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका वाढू शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भोसलेवाडी परिसरातील रहिवाशांच्या घरांमध्ये पूर्वीही पाणी शिरून आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संपूर्ण मुरूड शहरातील पावसाचे पाणी या मोरीतून समुद्राकडे वाहून जात असल्याने मोरीची क्षमता कमी झाल्यास शहरात जलसाच्याची समस्या निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
यासंदर्भात मे महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही काम सुरू असल्याने सद्याचे बांधकाम थांबवून मोरीची रुंदी व खोली वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भोसलेवाडी व परिसरातील सुमारे 80 नागरिकांच्या सह्या असून, त्याची प्रत मुरूड तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मुरूड-जंजिरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यावेळी नगरसेविका प्रांजली मकु, सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर, विशाल कोलवणकर, जाहिद फकजी आणि ऋत्विज मकु उपस्थित होते.







