पनवेल व्यापारी महासंघाची आयुक्तांकडे मागणी
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
दिवाळीचा सण जवळ आल्याने पनवेल महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांवर सुरू असलेली तोडक कारवाई दिवाळीपर्यंत थांबवावी, अशी मागणी पनवेल व्यापारी महासंघाने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सणासुदीच्या काळात व्यापारी आणि ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याची विनंती महासंघाने केली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात दुकानांसमोरील शटरपासून तीन फुटांपेक्षा अधिक जागेचा वापर तसेच पावसापासून संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या छपरांवर महापालिकेकडून तोडक कारवाई सुरू आहे. ही कारवाई योग्य असून, त्याला आपली हरकत नसल्याचे व्यापारी महासंघाने निवेदनात स्पष्ट केले आहे. मात्र, दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठ्या संख्येने ग्राहक येत असल्याने व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी भूमिका महासंघाने मांडली आहे. दिवाळी संपल्यानंतर व्यापारी स्वतःहून छप्पर आणि दुकानासमोरील अतिरिक्त व्यापलेली जागा हटवून ती मोकळी करून देतील, असे आश्वासनही निवेदनात देण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची खात्री करावी, अशी तयारी व्यापाऱ्यांनी दर्शवली आहे. पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली आणि खारघर येथील बाजारपेठांमधील तोडक कारवाई दिवाळीपर्यंत थांबवावी, अशी मागणी पनवेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नारायण ठाकूर यांनी केली आहे. आता या मागणीवर महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.







