बेकायदा होणारी दारू वाहतूक रोखा

बांद्यात पोलीस प्रशासनाला निवेदन

| बांदा | वार्ताहर |

बांद्यात घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील संशयिताचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा, तसेच सीमेवर गाळेल गावातून राजरोसपणे होणार्‍या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी केली.

यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांच्या नेतृत्वाखाली बांदा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक खंडागळे यांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहरात भरधाव वेगात वाहने चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे स्थानिकांच्या तसेच पादचार्‍यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतील संशयित अद्यापही मोकाट असून, पोलिसांनी त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर गाळेल येथून मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू महाराष्ट्र राज्यात येते. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी. अवैध दारू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. बांदेश्‍वर मंदिर चौकातील सीसीटीव्ही बंद असून, ते लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी साई काणेकर, ओंकार नाडकर्णी, बिपीन येडवे, अनिल नाटेकर, राजदीप पावसकर, धनेश नाटेकर, अजय महाजन, ज्ञानेश्‍वर येडवे, भाऊ वाळके आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक खंडागळे व पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्याशी पदाधिकार्‍यांनी चर्चा केली.

Exit mobile version