अनधिकृत बाईक ऑन रेंट व्यवसाय बंद करा

ऑटो रिक्षा चालकांचे साकडे

| रायगड | खास प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यामध्ये विनापरवाना अनाधिकृतरित्या सुरु असलेला बाईक ऑन रेंट हा व्यवसाय तात्काळ बंद करा, अशी मागणी अलिबाग येथील कुलाबा ऑटो रिक्षा संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. नजीकच्या कालावधीत तीन आसनी ऑटो रिक्षा आणि बाईक ऑन रेंट व्यावसायिकांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेण येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला याबाबत विचारणा करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले.

अलिबाग हे पर्यटकांचे हॉट डेस्टीनेशन बनले आहे. महानगराला खेटूनच असल्याने देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत असतात. त्यांना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून भटकंती करायची असते. यासाठी त्यांना बाईक ऑन रेंट हा पर्याय सोपा वाटतो. पर्यटकांच्या मागणीमुळे सध्या हा व्यवसाय फोफावला आहे. परंतु हा व्यवसाय करणाऱ्यांकडे कोणताही परवाना नाही, तरी देखील बिनधास्तपणे ते व्यवसाय करताना दिसून येतात.

बाईक ऑन रेंट हा व्यवसायामुळे अलिबागमधील तीन आसनी ऑटो रिक्षा चालकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. आम्ही परवाना घेऊन व्यवसाय करत आहोत. मात्र कोणताही परवना न घेता बेकायदेशीरपणे त्यांचा व्यवसाय सुरु आहे. रिक्षा व्यवसाय हा इतर दिवसांपेक्षा शनिवार, रविवार अथवा इतर सुट्टयांचे दिवशी बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असतो अशा वेळी भाडयाने बाईक ऑन रेट या विना परवानगीने अनाधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या व्यवसायामुळे आमच्या रिक्षा व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे आम्हाला आमचे कुटूंबाचा उदरनिर्वाह देखील करता येत नाही. तसेच कर्ज काढून रिक्षा व्यवसाय सुरू केलेल्या रिक्षा चालकांना बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्ते देखील नियमित भरता येत नाही. त्यामुळे तो अधिक अधिक कर्जबाजारी होत आहे. तालुक्यामध्ये भाडयाने बाईक ऑन रेट या विना परवानगीने अनाधिकृतपणे सुरू करण्यात आलेले व्यवसाय तात्काळ बंद करण्याबाबत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version