अनधिकृत बांधकाम, मॅन्ग्रोजची तोड थांबवा

न्याय्य हक्कासाठी जनआंदोलन उभारु माजी आ. पंडित पाटील यांचा इशारा
विहूर ग्रामस्थांनी घेतली पंडित पाटील, चित्रलेखा पाटील यांची भेट

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीत रौद परिसरात नियम पायदळी तुडविणार्‍या विकासकावर कारवाई व्हावी यासाठी अनेकदा अर्ज व निवेदने देऊनसुद्धा शासकीय यंत्रणा कारवाईकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप विहूर ग्रामस्थांनी केला. यासंदर्भात ग्रामस्थांनी शेकापचे माजी आ. पंडित पाटील व महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांची गुरुवारी भेट घेत त्यांना आपले गार्‍हाणे मांडले. वेळप्रसंगी शासनाविरोधात जनआंदोलन उभारु असा इशारा त्यांनी दिला असून, ग्रामस्थांना न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

यावेळी विहूर येथील शेकापचे युवक उपाध्यक्ष राहील कडू, विहूरचे माजी सरपंच रमेश दिवेकर, माजी सरपंच इकरार मोदी, तलहा कच्कोल, एजाज पंगारकर, माजी सरपंच सज्जाद उलडे, नवीद उलडे, मेहबूब उलडे, फैसल उलडे, दिलेर अन्सारी, शब्बीर कादरी, सौद पांगारकर, बशीर हलडे, मुबीन हलडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी महसुली कायद्याचे उल्लंघन करून तैजून निसार हसोन्जी यांचे हस्तक तीवरांची झाडे मागील सहा महिन्यांपासून मोकाटपणे तोडत आहे. बेकायदेशीर मातीचा भराव टाकत असल्यामुळे जैविक साखळी तोडून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर नाश करण्यात आला आहे. प्रवाळांसारख्या किनारी आणि सागरी जीवजंतूंच्या लुप्तप्राय प्रजातींचे संरक्षण करण्याऐवजी प्रशासन मात्र कोणतीच कार्यवाही करीत नाही. बैलगाडीने रेती वाहतूक करून उदरनिर्वाह करणार्‍या गोरगरिबांना प्रशासन रात्रीच्या वेळी जागे राहून कर्तव्याच्या नावाखाली त्यांच्या गाड्या पकडत आहेत; परंतु विहूर येथे दिवस-रात्र चालत असलेल्या कोट्यवधींचे बेकायदेशीर बांधकाम सुरु असतानासुद्धा सर्व शासकीय यंत्रणा आपापले हात धुवून घेत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली.

यावेळी पंडित पाटील व चित्रलेखा पाटील यांनी लवकरात लवकर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई न झाल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असे संबंधित महसूल व पोलीस प्रश्‍नाला भ्रमणध्वनीवरून कळवले आहे.

विहूर येथील विकासक मुजोरपणा सुरु असून, येथील लोकांनी अनेक वेळा तक्रार अर्ज करूनसुद्धा त्यांना दाद दिली जात नसेल, तर यापुढील आंदोलन आम्ही लोकशाही पद्धतीने करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देऊ. – माजी आ. पंडित पाटील

Exit mobile version