अखेर काम बंद आंदोलन स्थगित

जिल्हाधिकांच्या समवेत झालेल्या बैठकीतून तोडगा निघाला

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मंडळ अधिकारी यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. दाखल्यांसह वेगवेगळी अनेक कामे या बंदमुळे रखडली. त्याचा प्रशासकीय कामावर मोठा परिणाम झाला. अखेर जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली. सकारात्मक झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती तलाठी संघाकडून देण्यात आली.

अलिबाग तालुक्यातील शहापूर येथील मंडळ अधिकारी रविदास जाधव यांच्यासह पाच जणांविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमीन भूसंपादन प्रक्रियेत आणि नुकसान भरपाई वाटपात घोटाळा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये मंडळ अधिकारी रविदास जाधव आणि तलाठी सतीश ढवळे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील मंडळ अधिकारी रविदास जाधव यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. रविदास जाधव यांना पोलिसांनी बेकायदेशीररित्या अटक केल्याचा आरोप करीत सोमवारपासून काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. कार्यालयांमध्ये शुकशुकाट निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशीही सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले.
यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी तलाठी संघाच्या शिष्टमंडळ आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठक आयोजित केली. या बैठकीत हा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच 338 कलम काढण्याबरोबरच तलाठी यांनाही अटक न करण्याबाबत तलाठी संघाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित केल्याचे तलाठी संघाकडून सांगण्यात आले.

Exit mobile version