हर्णे बंदरात मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
दिवाळी सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची हर्णे बंदरात मासळी खरेदीसाठी गर्दी झाली असून, हर्णे बंदराला जत्रेचे स्वरूप आले होते. कोरोनामुळे थांबलेलला पर्यटन उद्योग पुन्हा सुरू झाल्यामुळे, खवय्ये पर्यटक ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावू लागले आहेत.
दापोलीमध्ये आलेला पर्यटक हर्णे बंदरामध्ये आल्याशिवाय माघारी फिरत नाही. ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली पण सुरुवातीपासूनच वारंवार वादळांच्या तडाख्यांमुळे गेले दोन महिने मासळीची आवकच झाली नाही. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापासून नौका मासेमारी करिता समुद्रामध्ये जायला लागल्या आहेत. आता येणार्‍या मासळीमध्ये फिशमीलच प्रमाण जास्त असून खाण्यासाठी लागणार्‍या मच्छीच प्रमाण खूप कमीच आहे. परंतु रोज जाणार्‍या छोट्या होड्या किरकोळ मासळी आणत आहेत. त्याच मासळीच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
पश्‍चिम महाराष्ट्रामधून येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. दापोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णे बंदरामधील मासळीच्या वेगवेगळ्या जाती खाण्यासाठी येतच असतात. त्याप्रमाणे आता तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटकांची कोकणात यायला सुरुवात झाली आहे.
सध्या केळशी, हर्णे, पाजपंढरी येथील छोट्या बोटी सकाळी मासेमारीला जाऊन विक्रीसाठी मासळी घेऊन बंदरात येत आहेत. अश्या छोट्या बोटींच्या आणि मोठ्या नौकाच्या कमी प्रमाणात येणार्‍या मालावरच सध्या हर्णे बंदरात बाजार चालू आहे. छोट्या बोटी मात्र पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा आदी प्रकारच्या मासळी घेऊन येत असल्याने पर्यटकांची मासळी खाण्याची व्यवस्था होत आहे.

Exit mobile version