मच्छिमारांचे डोळे आकाशाकडे
। मुरूड जंजिरा । प्रतिनिधी ।
मे महिन्याची उन्हाळी सुट्टी असल्याने आणि पर्यटनाचा सिझन असल्याने मुरूड तालुक्यातील पर्यटन स्थळावर पर्यटकांची वाढती मांदियाळी दिसत असली तरी वादळी हवामानाची चिन्हे समुद्रातून दिसू लागली आहेत. समुद्रातील पाण्याला फेस येऊ लागल्याने वातावरण बदलत असून वादळी मान्सून नजीक आल्याचा सिग्नल आहे, अशी माहिती मुरूड कोळी समाज अध्यक्ष मनोहर बैले, यांनी बुधवारी बोलताना दिली.
समुद्राच्या पाण्याचा रंग सफेद- निळा किंवा काही वेळा गढूळ असा बदलत असून मोठ्या लाटा उसळत आहेत. पाण्याला मौजा वाढल्यामुळे मुरूड समोरून पदमजलदुर्ग जलदुर्गाकडे जाणार्या प्रवाशी जलवाहतूक नौका तातडीने बंद करण्यात आल्याची माहिती नौका चालक मनोहर बैले, यांनी बोलताना दिली. मात्र समुद्रातील उलथापालथीमुळे पाण्याला मौजा वाढल्याने आधिक धोका न पत्करता पदमजलदुर्ग कडे जाणारी बोट सेवा तूर्त बंद करण्यात आल्याची माहिती मनोहर बैले यांनी दिली. तर किनार्यावर मच्छिमारांची नौकांची बांधबंधिस्ती आणि चोप्रान, डागडुजी सुरू झालेली दिसत आहे. पाऊस कधी येईल याचा नेम नसल्याने मच्छिमारांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
1 जून ते 31 जुलै कालावधीत मासेमारी बंदी जाहीर
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार दि.1 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून 61 दिवस) या कालावधीत मासेमारी बंदी घोषित केली आहे. या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या वीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब/वादळी हवामानामुळे होणारी जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनार्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली असून पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणार्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नाही.
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल, तसेच दंडात्मक शिक्षा करण्यात येईल. दि.1 जून 2022 पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना दि.1 जून 2022 नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 अंतर्गत कारवाईस पात्र राहतील, असे सूचित करून सर्व मासेमारी नौका दि.31 मे 2022 वा तत्पूर्वी बंदरात पोहोचतील, याबाबत संबंधित नौकामालकांनी नोंद घ्यावी. तसेच या आदेशानुसार पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत कोणतीही यांत्रिक मासेमारी नौका कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही, याची संबंधितांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी आणि अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) एस.आर भारती यांच्याशी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय, तिसरा मजला, श्री सिद्धी अपार्टमेंट, डॉ.पुष्पलता शिंदे हॉस्पिटलच्या समोर, अलिबाग-पेण 02141-295221 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय एस.आर भारती यांनी केले आहे.