सुदैवाने पाच जण थोडक्यात बचावले
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली-खोपोली राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असतानाच रविवारी (दि. 13) कारचा विचित्र अपघात झाला. पालीहून कार्ला येथे आई एकविरेच्या दर्शनासाठी जात असताना, शेमडी गावाजवळ कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडावर आदळली. झाडाला आदळून ही कार रस्त्याच्या बाजूला आकाशाकडे तोंड करून उभी होती. सुदैवाने कारमधील पाच तरुण थोडक्यात बचावले.
हा अपघात रविवारी (दि. 13) सायंकाळच्या सुमारास झाला. पाली-खोपोली राज्य महामार्गावरील शेमडी गावाजवळच्या वळणावर कारचालकाचा कारवरील ताबा सुटून कार थेट रस्त्याच्या बाजूच्या झाडावर आदळून उलटली. यात कारची पुढील बाजू व चाके आकाशाकडे उंचावलेली होती. यावेळी कारमधून पाच तरुण प्रवास करत होते. सुदैवाने कोणालाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातानंतर, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना कारबाहेर काढले.







