कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून त्यावरच्या उपायांसाठी निरनिराळ्या पद्धतीची संशोधनं सुरू आहेत. लसीकरण सुरू झालं असलं तरी सॅनिटायझर, मास्क याचा वापर अनिवार्य आहे. सॅनिटायझरमधील अल्कोहोलमुळे विषाणू मरतात. पण, याच अल्कोहोलमुळे आता शरीराच्या आतील कोरोना विषाणूवर मात करता येऊ शकते असा दावा, संशोधकांनी केला आहे.
अमेरिकेत अल्कोहोल श्वसनावाटे शरीरात गेल्याने कोरोना बरा होऊ शकतो का, यावर संशोधन सुरू आहे. या प्रयोगाचे तीन टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. त्या संशोधनाअंती काही रुग्णांना श्वसनाचा त्रास कमी झाल्याचं निष्पन्न झालं आहे.अल्कोहोलची वाफ घेतल्याने फुफ्फुसातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, असं या संशोधकांचं म्हणणं आहे. खरंतर अल्कोहोलची वाफ घेण्याची उपचार पद्धत खूप जुनी आहे, पण तिचा उपयोग कोरोनाच्या काळात होण्याच्या शक्यतेला पहिल्यांदाच यश मिळालं आहे.