आरोग्य विभागातील खुर्चीचा वाद संपेना
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांच्या बदलीला मॅट न्यायालयात स्थगिती देण्यात आली. त्यामुळे त्या पुन्हा जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्विकारण्यासाठी हजर झाल्या. मात्र, त्यांच्या जागी सुर्यवंशी यांची आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याने आरोग्य विभागात खुर्चीचा वाद सुरू झाला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांची रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात क्षयरोग अधिकारी म्हणून प्रशासकीय बदली करण्यात आली. या बदली विरोधात त्यांनी मॅट न्यायालयात दाद मागितली. मॅट न्यायालयाने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. त्यामुळे डॉ. मनीषा विखे या पुन्हा आरोग्य अधिकारी पदावर हजर होण्यासाठी गुरुवारी दाखल झाल्या. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या जागी डॉ. दयानंद सुर्यवंशी यांची नियुक्ती केल्याने आरोग्य विभागात खुर्चीचा वाद सूरू झाला आहे. दोघांनीही जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नक्की कोणाला न्याय देणार, असा सवाल उपस्थित केला जात असतानाच त्यांनी सुर्यवंशी हेच आरोग्य अधिकारी असतील असे स्पष्ट केले. मात्र, डॉ. मनीषा विखे यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सुरु आहे. तर डॉ. विखे ठाणे येथे न जाता झालेल्या अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.
डॉ. मनीषा विखे यांची प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी डॉ. दयानंद सुर्यवंशी यांची जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे सुर्यवंशी हेच जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत.
नेहा भोसले
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद