जागेवर न जाता पोटहिस्स्यांचे नकाशे?; शेतकरी मलिक दवनाक यांचा गंभीर आरोप
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
शेतजमिनीच्या पोटहिस्स्याची मोजणी आणि नकाशे तयार करताना प्रत्यक्ष जागेची पाहणी करणे अपेक्षित असताना कार्यालयात बसूनच नकाशे तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप श्रीवर्धन तालुक्यातील मेघरे येथील शेतकरी मलिक अहमद युनुस दवनाक यांनी केला आहे. चुकीच्या पोटहिस्स्यामुळे आपल्या जमिनीचा काही भाग दुसऱ्याच्या हद्दीत गेल्याचा दावा करत दवनाक यांनी संबंधित भूमिअभिलेख अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या तक्रारीची चौकशी अद्याप प्रलंबित असतानाच लगतच्या हिस्सेदाराने पुन्हा मोजणीसाठी अर्ज केल्याने ‘आधी चौकशी की आधी मोजणी?’ असा सवाल उपस्थित झाला आहे. मेघरे गावाच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक 19/2 या जागेची मूळ मालकाकडून विविध व्यक्तींना विक्री झाल्यानंतर पोटहिस्से करण्यात आले. यातील गट क्रमांक 142, क्षेत्र 1-28-0, आकार 0.45 रुपये ही जमीन मलिक अहमद युनुस दवनाक यांनी 10 ऑक्टोबर 2023 रोजी खरेदीखताने घेतली. या जागेवर जुनी आंब्याची कलमे, बोअरवेल तसेच पडीक घर असल्याचे दवनाक यांनी म्हटले आहे. मात्र, पोटहिस्से करताना भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन ताबा, कब्जा व वहिवाट तपासली नाही, तसेच त्यानुसार नकाशे तयार करण्यात आले नसल्याचा आरोप दवनाक यांनी केला आहे. परिणामी आपल्या जमिनीतील काही भाग दुसऱ्या व्यक्तीच्या हिस्स्यात समाविष्ट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकाराची दखल घेत दवनाक यांनी कोकण प्रदेशाच्या भूमिअभिलेख उपसंचालकांकडे अर्ज करून चुकीचे पोटहिस्से प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासून दुरुस्त करण्याची मागणी केली. हा अर्ज चौकशीसाठी अलिबाग जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, पुढील चौकशीसाठी तो श्रीवर्धन भूमिअभिलेख कार्यालयाकडे आला आहे.
मात्र, चौकशीचा निकाल लागण्यापूर्वीच पुन्हा मोजणीचा प्रयत्न झाल्याने वादाला नवे वळण मिळाले आहे. 6 ऑगस्ट 2026 रोजी लगतच्या जागेच्या मोजणीसाठी भूकरमापक अधिकारी घटनास्थळी गेले. मात्र, शेजारी जमीनमालक म्हणून दवनाक यांना कोणतीही लेखी नोटीस देण्यात आली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी मोजणीस हरकत घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मोजणी न करता पंचनामा व जबाब नोंदवून परतल्याचे दवनाक यांनी सांगितले. त्यानंतरही संबंधित हिस्सेदाराचा मोजणी अर्ज पुन्हा स्वीकारण्यात आल्याने दवनाक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जुन्या पोटहिस्स्याच्या नकाशांबाबत तक्रार आणि चौकशी प्रलंबित असताना नवीन मोजणीला परवानगी कशी? असा सवाल त्यांनी केला आहे. मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी संबंधित जागामालकाने केल्याचेही दवनाक यांनी नमूद केले असून, हा बंदोबस्त देऊ नये, अशी मागणी त्यांनी रायगडच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
याशिवाय, जुन्या जागेचे पोटहिस्से करताना दोन सातबारेही गायब झाल्याचा दावा दवनाक यांनी आपल्या अर्जात केला आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाज संथ असल्याचे तसेच अनेकदा अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
‘चौकशी आधी की मोजणी आधी?’
दवनाक यांच्या तक्रारीची चौकशी पूर्ण होऊन चुकीचे नकाशे दुरुस्त होण्यापूर्वीच पुन्हा मोजणीचा मार्ग मोकळा केल्यास वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूमिअभिलेख विभागाने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







