| वाघ्रण | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण गावात उनाड कुत्र्याची दहशत निर्माण झाली असून, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. वाघ्रण गावात सर्वत्र उनाड कुत्र्यांची संख्या भरमसाट झाली असून, संबंधित प्रशासनाने तातडीने उपाय योजना व बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून करण्यात येत आहे.
नुकतेच वाघ्रण गावातील उनाड पिसाळलेल्या कुत्र्याने दोन दिवसांपूर्वी दोन महीलांचे जोरदार चावे घेतल्याने दोघींवर उपचार रुग्णालयात चालू आहेत. प्रगती पाटील व गुलाब पाटील अशी त्या महिलांची नावे असून, दोघीनांही पिसाळलेल्या कुत्र्याने रक्तबंबाळ केले आहे होते. या दोघींपैकी प्रगती पाटील यांचा रक्तप्रवाह जास्त झाला आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि इतरांना घराबाहेर पडताना जपून बाहेर पडावे लागत आहे. काही जण हातात संरक्षण म्हणून काठी घेऊनच ये-जा करताना दिसत आहेत. हे कुत्रे पाठीमागून येऊन हल्ला करतात. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांसह सेवाश्रम सामाजिक संस्था वाघ्रणकडून देखील करण्यात येत आहे.







