उरणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

विद्यार्थी, महिला, वयोवृध्द, कर्मचार्‍यांना त्रास

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यात ग्रामीण भागात व उरण शहरातील भागात मोकाट भटकणार्‍या व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या कुत्र्यांमुळे उरणमध्ये दहशतीचेे वातावरण आहे. सकाळी शाळेत जाणारे मुले, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, रात्री उशिरा कामावरून घरी परतणारे कर्मचारी, कामगारांवरही मोकाट कुत्रे हल्ले करत असल्याने उरण तालुक्यातील ग्रामीण भागात व उरण शहरात प्रवास करणे फारच धोकादायक झाले आहे.

अनेक ठिकाणी नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. उरण नगरपरिषद हद्दीमध्ये नगरपरिषद प्रशासनाने पाहिजे तसे लक्ष न दिल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उरण नगरपरिषद हद्दीतील वीर सावरकर मैदान (लाल मैदान) येथे काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी एका व्यक्तीला हातावर चावून जखमी केले होते.

जखमी व्यक्तीला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, नगर परिषदेने या महत्त्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने सदर मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उरण नगरपरिषदेने सक्षम यंत्रणा राबवून निर्बिजीकरणाची करण्याची प्रक्रिया राबवावी व भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी याची भूमिका समजू शकली नाही.

Exit mobile version