लहान मुलगा गंभीर जखमी; प्रशासनावर नागरिकांचा संताप
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांचा आक्रमक स्वभाव यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत भटक्या कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे मोठे टोळके फिरताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच एका महिलेवर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करून तिला जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच लहान मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील प्रत्येक नाका, चौक आणि गल्लीमध्ये कुत्र्यांचे टोळके दिसून येतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे. काही वेळा हे कुत्रे लोकांच्या हातातील अन्नपदार्थ किंवा वस्तू हिसकावून नेण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली निर्बीजीकरण (स्टेरिलायझेशन) मोहीम अनेक वर्षांपासून प्रभावीपणे राबवली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नगरपरिषदेने यासाठी निविदा काढली होती, मात्र कोणत्याही संस्थेकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया रखडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा काही नागरिकांनी दिला आहे. तोपर्यंत पालकांनी लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
मोकाट कुत्रे पकडण्यासाठी तसेच त्यांच्या निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरणासाठी लवकरच नवीन निविदा काढण्यात येणार आहेत. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत ही मोहीम लवकरात लवकर राबवली जाईल.
अनंत गुरव,
उपनगराध्यक्ष, श्रीवर्धन
