भटक्या कुत्र्यांची बाजारात दहशत

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे शहरात सर्वत्र मोकाट फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांची नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. टोळी-टोळीने फिरणार्‍या व रहदारीच्या रस्त्यावरच ठाण मांडून बसणार्‍या या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना विशेषत: लहान मुले व महिलांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. सध्या तर या भटक्या कुत्र्यांची नागोठणे बाजारपेठेत भटकंती सुरू असल्याने बाजारात दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक विशेषतः महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या मोकाट भटक्या कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजनेद्वारे बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

नागोठणे शहरासह परिसरांत या मोकाट, भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांकडून नागोठणे शहरांत लहान मुले, नागरिक यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जखमी करण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. नागोठणे शहरातील अनेक मुख्य रहदारीचे रस्ते, बाजारपेठ, मटण व मासळी बाजार, तसेच अनेक मोक्याच्या ठिकाणी ही भटकी कुत्री मोठ मोठ्या गटाने एकत्रितपणे उभी राहात असल्याने शाळेत जाणारी मुले, बाजारात कामानिमित्त येणारे नागरिक, महिला, सकाळी-संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरण्यास बाहेर पडणारे वयोवृध्द नागरिक या सर्वांना रस्त्यावरून चालतांना या भटक्या कुत्र्यांच्या भीतीचे व दहशतीचे एक प्रकारचे मोठे दडपण घेऊनच चालावे लागत आहे.

नागोठण्यात या भटक्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केलेली असतानाच त्यांच्या निर्बिजीकरणासंदर्भात कोणताही ठोस निर्णय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन घेत नसल्याने या भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत यावर भविष्यात कोणती ठोस उपाययोजना करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version