रस्त्याच्या दुतर्फा बसविले पथदिवे

श्रीवर्धनमधील कोपरी रस्ता उजळणार ,मुख्याधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात शहर प्रगतीपथावर

| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या मार्गदर्शनात शहरात विविध प्रकारची विकासकामे सुरु असल्याचे दिसून येते. शहरातील पेशवे आळी ते बाजार पेठ यांना जोडणारा कोपरी पदपथ झाल्यामुळे नागरिकांची मोठीच सोय झाली आहे. पेशवे आळीमधून थेट बाजारपेठ, भाजी मार्केटला जोडणारा जवळचा मार्ग तयार झाला असून, या पदपथावर पथदिवे आणि पदपथाच्या दुतर्फा लोखंडी कठडे (रेलींग) व्हावे, अशी नागरिक आणि पत्रकारांची जोरदार मागणी होती. मुख्याधिकारी श्री. लबडे यांनी यामध्ये लक्ष घालून या पदपथावर नुकतेच पथदिवे बसविण्यात आल्यामुळे नागरिक धन्यवाद देत आहेत.दरम्यान, या पदपथावरुन पावसाळी खालून वाहणार्‍या नाल्यात वा एरवी असलेल्या मोकळ्या जागेत कोणी पडून अपघात होऊ नयेत म्हणून तेथे शक्य तितक्या लवकर कठडेही बसविण्यात यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

तद्वतच सध्या श्रीवर्धन शहरात सर्वत्र अतिशय वेगाने सुरु असणारे विकासकाम म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम. नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे ही नागरिकांची पुष्कळ वर्षांची मागणी होती. खा. सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांनी सदरच्या सुमारे साडे बावीस कोटी रुपये खर्चाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम मंजूर होऊन ते काम शहरात सर्वत्र वेगाने सुरुही झाले आहे. मुख्याधिकारी श्री. लबडे, नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता विकास वागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी नवीन पाईप लाईन्स टाकण्याचे कामही वेगाने सुरु आहे. सुमारे चार महिन्यांत हे काम पूर्ण होऊन नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल, असे अपेक्षित आहे.

या विकास कामांबरोबरच नगर परिषद प्रशासनाने न.प.शिक्षण विभागाकडेही अधिक लक्ष पुरविण्याची गरज आहे. शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली शहरात सहा प्राथमिक शाळा आहेत. परंतु, तत्कालिन प्रशासन अधिकारी श्रीम. सोनकुसळे यांची अन्यत्र बदली झाल्यापासून मे 2018 पासून शिक्षण मंडळासाठी पूर्ण वेळ प्रशासन अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून महाड, अलिबाग, मुरुड इ. ठिकाणच्या प्रशासन अधिकार्‍यांकडे श्रीवर्धन शिक्षण मंडळाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला जातो. त्यामुळे साहजिकच कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होऊन येथील शिक्षण मंडळाशी संबंधित कामांस विलंब होतो. त्यामुळे शासनाने श्रीवर्धन शिक्षण मंडळास पूर्णवेळ प्रशासन अधिकारी तातडीने उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी गेल्या सुमारे दोन वर्षांपासून होत आहे, परंतु तीअद्याप पूर्ण झालेली नाही.

Exit mobile version