विजेची उधळपट्टी; सिडको प्रशासनाचा ढिसाळ कारभार
| उरण | प्रतिनिधी |
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना वीज बचतीचे धडे देणारे प्रशासन स्वतः मात्र किती बेजबाबदारपणे वागते, याचा प्रत्यय उरण येथील सिडकोच्या कोस्टल रोडवर पाहायला मिळत आहे. या कोस्टल रोडवर मागील कित्येक दिवसांपासून दिवसाढवळ्या पथदिवे (स्ट्रीट लाईट्स) सुरू असल्याचे चित्र असून, यामुळे दररोज हजारो युनिट विजेची नाहक उधळपट्टी होत असून अशा पथदिव्यांच्या प्रकाश झोक्यामुळे वातावरणातील उष्णतेत अधिक भरत पडत आहे.
उरण येथील सिडकोच्या अखत्यारित येणाऱ्या या प्रमुख कोस्टल रोडवर मागील काही दिवसांपासून हे विजेचे दिवे चोवीस तास म्हणजेच रात्रंदिवस सुरू आहेत. विशेष म्हणजे, सिडकोच्याच काही अंतर्गत रस्त्यांवर रात्रीच्या वेळी घोर अंधार असतो, ज्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत, जिथे गरज आहे तिथे अंधार आणि जिथे गरज नाही अशा कोस्टल रोडवर थेट भरदिवसा कडक उन्हातही पथदिवे लखलखत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या मार्गावरून दररोज हजारो वाहने, कंटेनर आणि नागरिक ये-जा करत असतात. भरदिवसा सुरू असणाऱ्या या दिव्यांकडे सिडकोच्या विद्युत विभागाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. ही विजेची उधळपट्टी म्हणजेच जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे, अशी टीका स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. सिडको प्रशासनाने या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घेऊन दिवसा सुरू राहणारे पथदिवे बंद करावेत आणि रात्रीच्या वेळी ज्या रस्त्यांवर अंधार असतो, तिथे प्रकाश व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
