| चिरनेर | वार्ताहर |
मागील दीड वर्षापासून खोपटा पूल ते जेएनपीटी कोस्टल रोड एनएच 348 पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. हा रस्ता लवकरात लवकर खड्डे बुजवून नव्याने तयार करण्यात यावा, यासाठी गोरख ठाकूर आणि उरण पूर्वच्या नागरिकांकडून सातत्याने मे महिन्योपासून पाठपुरावा सुरू होता. त्यास यश आले असून, रोडचे काम सुरू झाले आहे.
संबंधित रस्ता हा सिडकोच्या अखत्यारीत येत असून, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक 24 तास सुरू असते. तसेच या मार्गावरून उरण पूर्व विभागातील कामगार तसेच वाहनेही नवी मुंबई व मुंबईला ये-जा करत असतात. रस्त्याची अवस्था फार बिकट असल्यामुळे येथे अनेक लहान-मोठे अपघातदेखील घडलेले आहेत. या पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था फार दयनीय झाली होती. खोपटे पूल ते जेएनपीटी महामार्गपर्यंत असलेल्या कोस्टल रोडवर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली होती. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर खड्डे बुजवून नव्याने तयार करण्यात यावा, यासाठी गोरख ठाकूर आणि उरण पूर्वच्या नागरिकांकडून सातत्याने मे महिन्याच्या दोन तारखेपासून पाठपुरावा सुरू होता.
त्यासंदर्भात सिडकोकडून तातडीने खड्डे बुजून रस्ता व्यवस्थित करण्याची निविदा 27 सप्टेंबरला काढण्यात आली होती. दरम्यान, निविदा निघाल्यापासून खोपटे येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर आणि येथील नागरिकांकडून सातत्याने या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा सुरूच होता. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी हा रस्ता लवकरच सुसज्ज असा होणार आहे.