। मंडणगड । प्रतिनिधी ।
येणार्या पिढ्यांच्या आणि पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी पर्यावरणीय समतोल आणि भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल जाधव यांनी केले. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ’स्त्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण’ या दोन दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रशिक्षण जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आणि जेपीएस फाऊंडेशन लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड येथील श्रीकृष्ण सभागृह येथे दि.04 व 05 जून रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी पाण्याच्या तपासणीसाठी राज्य शासनातर्फे ग्रामपंचायतींना देण्यात येणार्या क्षेत्रीय तपासणी संचांच्या (फील्ड टेस्टिंग किट) वितरणाचा देखील प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ करण्यात आला. तसेच, ’जलजीवन मिशन’ योजना हस्तांतरीत झाल्याचे घोषित करणार्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्यांचा प्रमाणपत्र आणि रोपे देऊन गौरव करण्यात आला.
पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वतीकरणाचे महत्त्व व्यक्त करतानाच पाण्याची नियमित तपासणी आणि गुणवत्ता नियंत्रण हे साथरोग प्रतिबंधासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जाधव यांनी केले. विस्तार अधिकारी राजेंद्र मोहीते यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक आदी उपस्थित होते.