अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे नागरिक हैराण; परिवहन सेवेत वाढ करण्याची मागणी
| पालघर | प्रतिनिधी |
शहरातील वाढती लोकसंख्या, रस्त्यांवरील वाहनांची वाढ आणि अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे वसई विरारमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. बस गाड्यांची संख्या आणि फेऱ्या वाढवून परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. वसई विरार महानगरपालिकेचा परिवहन विभाग दरवर्षी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करतो. हा अर्थसंकल्प साधारणपणे 70 ते 80 कोटी रुपयांच्या घरात असतो. मागील काही वर्षात परिवहन भवन उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी राखून ठेवण्यात आला होता. आता भवन उभारणी पूर्ण झाल्याने निधी थेट सेवा विस्तार आणि बसखरेदीकडे वळवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या महापालिकेकडे सुमारे 120 बस गाड्या उपलब्ध असून त्यापैकी सुमारे 110 बस रस्त्यावर धावत आहेत. शहरातील 38 मार्गांवर बससेवा दिली जाते. मात्र नालासोपारा, नायगाव, वसई आणि विरार या भागात बसफेऱ्या अपुऱ्या असल्याची तक्रार वारंवार पुढे येते. परिणामी नागरिकांना रिक्षा किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे वाहतूककोंडी वाढत आहे. महापालिकेतर्फे महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, कर्करोग रुग्ण, डायलिसिस करणारे रुग्ण आणि शालेय विद्यार्थ्यांना मोफत बसपास दिला जातो. या योजनेसाठी दरवर्षी सुमारे 20 ते 22 कोटी रुपयांचा खर्च होतो. समाजिकदृष्ट्या महत्वाची ही योजना असली तरी महसुलावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
दरम्यान केंद्र सरकारच्या ‘नॅशनल क्लीन एअर’ कार्यक्रमांतर्गत काही बसगाड्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तसेच 18 सीएनजी बसगाड्या आधीपासून कार्यरत आहेत. यंदा पंतप्रधान योजनेंतर्गरत 100 नव्या ई- बस गाड्या शहरात दाखल होणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 37 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातील 27 कोटी रुपये शासनाकडून मिळाले आहेत. उर्वरित 10 कोटींसाठी महापालिकेला स्वत:च्या अर्थसंकल्पातून तरतूद करावी लागणार आहे.
प्रभावी नियोजन आवश्यक
या ई-बसगाड्यांसाठी वसईतील नवघर येथे आणि नालासोपारा पश्चिमेला बस डेपो उभारण्याचे काम सुरू आहे. नव्या बस दाखल झाल्यानंतर मार्गसंख्या आणि फेऱ्या वाढवण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र यासाठी प्रभावी नियोजन आणि आर्थिक शिस्त आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे.
वाहतूककोंडी दिलासा मिळेल
परिवहन सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी, बसगाड्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि फेऱ्या नियमित करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात ठोस आणि भरीव तरतूद करावी, अशी अपेक्षा वसई विरारकर व्यक्त करत आहेत. सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्यास वाहतूककोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.
