। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विनामास्क फिरणार्या इसमांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करुन विनामास्क केसेस करण्यात येवू नयेत, असे पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या कार्यालयाकडून पाठविण्यात आलेले दि. 7 मार्च 2022 चे पत्र समाजमाध्यमांव्दारे फिरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
तरी विनामास्क फिरणार्या इसमांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत,असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी कळविले आहे.
विनामास्क केसेस दंड करण्याबाबतचे दि. 7 मार्च 2022 रोजीचे पत्र अपर पोलीस अधीक्षक, रायगड यांनी त्यांच्याकडील दि.11मार्च 2022 रोजीच्या पत्रान्वये मागे घेतले आहे. तरी विनामास्क फिरणार्या इसमांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच शासनाने कोव्हिड-19 अनुरुप वर्तनासंदर्भात दिलेल्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
जिल्ह्यात मास्क न लावणार्यावर कायदेशीर कारवाई करण्यास बंद करण्याचा निर्णय रायगड पोलिसांनी मागे घेतला आहे. त्यामुळे मास्क न लावता फिरल्यास आता पुन्हा नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्हा सुरक्षा विभागाने काढलेल्या पत्रामुळे जिल्ह्यात गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे काढलेले पत्र मागे घेत असल्याचे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल यांनी पत्राद्वारे सर्व पोलीस ठाणे प्रभारी, वाहतूक पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पत्र पाठविले आहे. कोरोना नियमांचे पालन व्हावे, कोरोनाचा प्रसार होऊ नये याची दक्षता घेऊन कारवाई करा असेही पत्रात म्हटले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हा सुरक्षा विभागाचे राजन जगताप यांनी 7 मार्च 2022 रोजी सर्व पोलीस ठाणे अधिकारी, वाहतूक अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना मास्क न लावता फिरणार्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करू नका असे पत्र दिले होते. मात्र याबाबत जिल्ह्यात गैरसमज निर्माण झाल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ लागले होते. याबाबत जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी 11 मार्च रोजी सुरक्षा शाखेने काढलेले पत्र मागे घेत असल्याचे पत्र काढले आहे. तशा सूचना सर्व पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे जनतेतून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.