। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापुर येथील शेतकर्यांच्या संपादित करण्यात आलेल्या जमिनी शेतकर्यांना परत देऊन शेत जमिनीच्या 7/12 उतार्यावर संपादित करण्यात आल्याबाबतचा असलेल्या एमआयडीसी शिक्याची नोंद कमी करून शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली आहे.
आपल्या मागणीत आ. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर येथील शेतकर्यांच्या शेत जमिनी एमआयडीसीकडून संपादित करण्यात आलेल्या असून त्यांचा मोबदला आज पर्यंत प्रकल्प ग्रस्त शेतकर्यांना देण्यात आलेला नाही. व सदर संपादित जागेवर प्रकल्प देखील उभारण्यात आलेला नाही. परंतु संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या 7/12 उतार्यावर तसा एमआयडीसी शिक्का असल्यामुळे भात खरेदी-विक्री केंद्रावर शेतकर्यांना भात विक्रीकरण्यासाठी 7/12 ऑनलाईनमध्ये स्वीकृत होत नसल्यामुळे त्यांच्या भाताची भात खरेदी-विक्री केंद्रावर खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे कमी भावात इतरत्र भाताची विक्री करावी लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील शासनाकडून मिळत नाहीत. तसेच शासनाच्या विविध योजनेचा लाभ ही सदर शेतकर्यांना मिळत नसल्याचेही स्पष्ट केले.
आ. पाटील पुढे म्हटले आहे की, शेत जमिनीच्या 7/12 उतार्यावर एमआयडीसीचा शिक्का असल्यामुळे वारसांची नोंद होत नाही म्हणून अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापुर येथील शेतकर्यांच्या संपादित करण्यात आलेल्या जमिनी शेतकर्यांना परत देऊन शेतजमिनीच्या 7/12 उतार्यावर संपादित करण्यात आल्याबाबतचा असलेल्या एमआयडीसी शिक्याची नोंद कमी करून शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी आ.पाटील यांनी केली आहे.