। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
केळवा रोड (ता.जि. पालघर) भागातील झांझरोळी धरणाच्या बाहेरील बाजूस दि. 8 जानेवारी 2022 रोजी वा त्यासुमारास भगदाड पडून धरणाला गळती लागली. त्यामुळे धरण परिसरातील आठ गावांतील नागरिकांचे संरक्षणाच्या दृष्टीने तात्काळ स्थलांतर करण्यात आले होते. या धरणाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी जलसंपदामंत्र्यांकडे केली.
दरम्यान, पावसाळ्यात या धरणातून काही प्रमाणात गळती होत असल्याबाबत जलसंपदा विभागास तेथील ग्रामस्थांनी निदर्शनास आणूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही, हे आ. जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी उक्तप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने धरणाच्या गळतीकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकार्यांविरुध्द करून धरणाची गळती थांबविण्यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे, असा प्रश्न आ. जयंत पाटील यांनी विचारला.
यावेळी माहीम केळवा ल.पा. योजना ता.जि. पालघर येथे धरणाच्या मुख्य विमोचकाच्या रेषेतील प्रवाहाला खालच्या बाजूस 4.00 मी. रुंद भराव ढासळून पोकळी निर्माण झाली.सद्य:स्थितीमध्ये धरणाच्या उर्ध्व बाजूस मुख्य व विहिरीभोवती माती भराव व खालच्या बाजूस खडी, वाळू व मातीच्या सहाय्याने धरणाच्या भागातील पोकळी भरण्यात आलेली आहे. त्यामुळे धरणातून होणारी गळती पूर्णपणे बंद झाली असल्याची माहिती जलसंपदामंत्र्यांनी यावेळी दिली.