| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात नवीन शिक्षण धोरणांतर्गत पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आगामी 2026-27 शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या प्रवेश नियमांमध्ये बदल करत फक्त सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच पहिलीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2026 पर्यंत ज्यांची सहा वर्षे पूर्ण होतील, अशा मुलांनाच 2026-27 या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. या नियमांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पूर्वी प्रवेशासाठी वयोमर्यादा 31 मार्चपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता ती बदलून 31 डिसेंबर करण्यात आली आहे. या संदर्भात डिसेंबर 2025 मध्ये शासनाने आदेश जारी केला असून राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास योग्य पद्धतीने व्हावा तसेच त्यांना बालपणाचा आनंद घेता यावा, यासाठी योग्य वयात शिक्षण सुरू होणे गरजेचे असल्याचे शिक्षकांचे मत आहे. प्रवेशासाठी मुलाचे जन्म प्रमाणपत्र हेच वयाचा अधिकृत पुरावा मानले जाणार आहे. प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता पहिली ते आठवी हे वय 6 ते 14 वर्षांदरम्यानचे असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.







