चौलच्या यात्रेवर सीसीटीव्हीची नजर

पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त

| अलिबाग | प्रमोद जाधव |

चौल-भोवाळे येथील चोरी प्रकरणानंतर रायगड पोलीस सतर्क झाले आहेत. पुन्हा हा प्रकार घडू नये यासाठी मंगळवार दि.26 पासून सुरु झालेल्या चौलच्या यात्रेत प्रवेशद्वारापासून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

रेवदंडा परिसरातील चौल-भोवाळे येथे दत्तजयंतीनिमित्त यात्रेला सुरुवात झालेली आहे. रविवार दि.31 पर्यंत ही यात्रा राहणार आहे. या सहा दिवसांत लाखो पर्यटक व भाविक दर्शनासाठी येणार आहेत. खाद्यपदार्थांपासून घरगुती साहित्यांपासून खेळण्यांची दुकाने या यात्रेत उभारण्यात आलेली आहेत. मागील वर्षी दत्तमंदिरात 40 किलो चांदीची प्रभावळ चोरीला गेली होती. त्याचा तपास अद्याप लागला नाही. त्यामुळे यंदा यात्रेमध्ये पोलिसांनी अधिक सर्तकता राखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी दोन ठिकाणी टेहळणी कक्ष व पोलीस मदत कक्ष बांधण्यात आले आहेत. 21 ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूण 80 पोलीस त्याठिकाणी नेमण्यात आले आहेत.

गर्दीमध्ये महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महिला छेडछाड विरोधी पथक नेमण्यात आले आहे. त्यामध्ये एक महिला अधिकारी, चार महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 24 तास ही यंत्रणा तैनात राहणार असल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी दिली.

दर पाऊण तासाने एसटी बस
भाविकांना यात्रेबरोबरच दर्शनासाठी वेळेवर निश्चित पोहोचता यावे यासाठी अलिबाग एसटी बस आगारामार्फत ज्यादा एसटी बसफेरीची व्यवस्था करण्यात आली आहे. चौल यात्रा स्पेशल या बसेस आहेत. दर पाऊण तासाने बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेमध्ये एसटी महामंडळाचा कक्ष असून, त्या ठिकाणी कर्मचारी तैनात केले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी दिली.
आरोग्य विभागाकडून जनजागृती
रायगड जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाबत असलेली भीती दूर करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जनजागृती सुरु करण्यात आली आहे. चौलमधील यात्रेत येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा, असे आवाहन केले जात आहे. आपल्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी, त्यासाठी काय उपाय करावे, याचे मार्गदर्शनही करण्यात येत आहे.
Exit mobile version