कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन स्थगित

गटविकास अधिकार्‍यांचे लेखी आश्‍वासन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर आंदोलनाच्या पाचव्या दिवशी दोन महिन्यांचे थकित वेतन कर्मचार्‍यांना देण्यात आले होते. मात्र, कर्मचार्‍यांनी कामबंद सुरूच ठेवले होते. दरम्यान, गटविकास अधिकारी यांनी कामगार प्रतिनिधींची भेट घेऊन लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या कर संकलन मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी कर्जत पंचायत समितीकडून एक देखरेख अधिकारी नियुक्त करण्यात आला असून, एप्रिल 2024 पर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान देण्यात आले आहे.

नेरळ ग्रामपंचायीच्या कामगारांनी थकित वेतन मिळावे म्हणून सोमवार, 11 मार्चपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. शुक्रवार 15 मार्च रोजी 87 कामगारांना दोन महिन्यांचे वेतन देण्यात आले होते, मात्र आपल्या उर्वरित मागण्यांसाठी शनिवारी सुट्टीच्या दिवशी नेरळमधील कामगार प्रतिनिधी यांना कर्जत पंचायत समितीत बैठकीसाठी बोलावून घेण्यात आले. तेथे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे तसेच, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्यासमवेत कामबंद आंदोलन करणार्‍या कामगार प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीतील यशस्वी चर्चेनंतर गटविकास अधिकारी यांनी कामगारांना लेखी आश्‍वासन दिले आणि त्यानंतर कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले.

या कामबंद आंदोलन कालावधीतील गैरहजेरीविषयी नियुक्ती प्रधिकरण म्हणून नियमोचित निर्णय नेरळ ग्रामपंचायत घेऊ शकते, असे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी महारष्ट्र नवनिर्माण कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष चंद्रकांत राठोड, गणेश चंचे, संतोष दरवडा, शिवाजी जाधव, गजानन मुरकुटे सुनील जाधव, अ‍ॅड. जगदीश डबरे आणि प्रतिभा शेळके आदी उपस्थित होते.

Exit mobile version