नेरळ पोलिसांची धडक कारवाई

गाडीवर ‌‘पोलीस’ लावल्याने गुन्हा दाखल

| नेरळ | वार्ताहर |

पुणे जिल्ह्यातील जुन्नर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेला एक व्यक्ती आपल्या खाजगी वाहनावर पोलीस नावाची पाटी लावून बिनधास्त फिरत होता. संबंधित व्यक्ती नेरळ येथे आला असताना नेरळ पोलिसांची गस्त सुरु होती. त्यामुळे संशय आल्याने नेरळ पोलिसांनी गाडी थांबवून चौकशी केली असता ती पाटी आणि व्यक्ती दोन्हीही बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान अधिक चौकशी केली असता त्याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. नेरळ पोलिसांच्या या धडक कारवाईने बनावट पाट्या लावणाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत.

चोऱ्या व चोरट्यांना रोखण्यासाठी सीसीटीव्हीसह नेरळ पोलिसांकडून रात्रीची गस्त घालण्यात येते. यादरम्यान संशयित व्यक्ती वाहन यांची कसून चौकशीदेखील करण्यात येते. तर गुरांच्या वाढत्या चोरीमुळे नाकाबंदीदेखील करण्यात येते. अशात नेरळ चिंचआळी येथे पोलिसांकडून वाहनांची चौकशी सुरु असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कार संशयित स्वरूपात पोलिसांना दिसून आली. तर या वाहनाच्या दर्शनी भागात पोलीस नावाची पाटी लावण्यात आली होती. त्यामुळे नेरळ पोलिसांनी त्यांना याबाबत विचारणा केली तेव्हा गाडीतील व्यक्ती आदिनाथ भगवान रणदिवे रा जुन्नर पुणे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा पोलिसांनी त्यांना थेट पोलीस ठाण्यात चौकशी केली. तेव्हा आदिनाथ भगवान रणदिवे याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

तर बाहेर फिरताना पोलीस नावाची पाटी लावून सर्वत्र बिनधास्त वावर करत आहे. तेव्हा नेरळ पोलिसांनी आदिनाथ भगवान रणदिवे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिसांनी आरोपीस अटक करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 35 (5) प्रमाणे नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version