शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
| खोपोली | प्रतिनिधी |
बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील शिपाई याने त्याच शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार बदलापूर येथे घडला आहे. मागील आठवड्यात देखील कर्नाटक येथे डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच ही धक्कादायक घटना बदलापूर येथे घडली आहे. घटना ही 12 ऑगस्ट रोजी घडली होती. त्याचे पडसाद खोपोलीसह खालापुरात उमटले असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. खोपोली शहरातील शिलफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत 21 ऑगस्ट रोजी निदर्शने करीत नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि महायुती सरकारवर तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री साहेब तुमची लाडकी बहीण सुरक्षित आहे का, असा सवाल विचारला आहे.
शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख डॉ. सुनील पाटील यांच्या पुढाकाराखाली बदलापूर येथे नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संपर्कप्रमुख डॉ.सुनील पाटील, खोपोली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख प्रवक्ते विलास चालके संघटक दिलीप पुरी, नितीन मोरे, प्रतीक शिंदे, विशाल म्हामुनकर, मोहन शिंदे, संतोष राठोड, महिला आघाडीच्या अनिता पाटील, शैला भगत, सुविधा विचारे, निकिता मोरे, रंजना राणे, कविता पाटील, किशोरी शिगवण, भाग्यश्री चव्हाण, भारती लोते, रिया मालुसरे, आरती तांडेल, आदिती गुरव तसेच शरद पवार राष्ट्रवादीच्या जैबुनिसा शेख आदीप्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.