महावितरणच्या कर्मचार्यांची दमदार कामगिरी ; पुराच्या पाण्यातून मार्ग काढत वीजपुरवठा सुरळीत

। राजापूर । वृत्तसंस्था ।
महावितरणच्या कामाला आपण नेहमीच शिव्या घालतो.वीज प्रवाह खंडित झाला की महावितरणच्या नावाने लाखोली सुरू होते.पण त्यांचं काम किती अवघड असतं,कधी कधी जीवावर बेतणारं असतं, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मोसम या गावात पूर आला होता.मात्र तिथल्या एका खांबावर पुढील गावाचा वीज पुरवठा अवलंबून होता.त्यामुळे छातीपर्यंतच्या पाण्यातून जाऊन तिथल्या रुपेश महाडिक या कर्मचार्याने त्या खांबावरचा खटका सुरु केला. वीज पुरवठा थोडा वेळ खंडित झाला तरी आपण बोटे मोडायला सुरूवात करतो. काही ठिकाणी महावितरण कर्मचार्यांना मारहाणही होते. पण त्यांचे काम किती जिकरीचे आहे, याचा अंदाजही आपल्याला येत नाही.

राजापूर तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राजापूर शहरासह अनेक ठिकाणी पूर आला आहे. तालुक्यातील मोसम या गावातही पूर आला आहे. तेथून पुढच्या काही गावांमध्ये वीज वाहिनी सदोष होती. त्यामुळे वीज खंडित खंडित करुन काम सुरू होते. मात्र सोमवारी काम पूर्ण होईपर्यंत मोसम गावात पूर आला. जेथे पुरवठा सुरू करण्याचा खटका आहे, त्या बनवाडीतील खांबानजीक काही फूट पाणी वर चढले आहे. मात्र तेथील खटका सुरू झाला नाही तर पुढची गावे अंधारातच राहतील. त्यामुळे महावितरणच्या केळवली विभागात काम करणारे रुपेश महाडिक, दर्शन जोगले या दोघांनी धाडस केले. रुपेश महाडिक छातीपर्यंतच्या पाण्यातून खांबापर्यंत गेला आणि त्याने खटका सुरू करुन पुढची गावे प्रकाशमान केली.

Exit mobile version