। रायगड । आविष्कार देसाई |
पेण तालुक्यातील शितोळे येथे मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्रांच्या सुरक्षीत साठवणुकीसाठी आधुनिक गोदाम (स्ट्राँगरुम) उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी सदरची इमारत रायगड निवडणूक विभागाकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांनी कृषीवलशी बोलताना दिली.
इमारत लवकरच निवडणूक विभागाच्या ताब्यात मिळणार आहे. आगामी होणार्या विधानसभेसह सर्व निवडणूकीसाठी वापरण्यात येणारी मतदान आणि व्हीव्हीपॅट यंत्र पेणच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे. वेळेसह पैशाची बचत होणार असून मतदान यंत्र सुरक्षीत राहणार आहेत. त्यामुळे आता पनवेलच्या गोदामात यंत्र ठेवावी लागणार नाहीत.
निवडणूकीचे काम अत्यंत जोखमीचे असते. त्यामध्ये प्रामुख्याने मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅट यंत्रांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. निवडणूका होण्याआधी आणि नंतर त्या सुरक्षीत ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. सध्या रायगड जिल्ह्यासाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्र ही पनवेल येथील धान्य गोदामात ठेवली जातात. निवडणूकीच्या कालावधीत त्यांची ने-आण करणे अत्यंत जिकरीचे काम असते. त्यामध्ये सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असतो. तसेच वेळ आणि पेशाचा अपव्यय होतो. यातून आता सुटका होणार असून प्रशासनासह पोलीसांची होणारी दमछाक थांबणार आहे.
मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्राच्या साठवणुकीसाठी बांधण्यात आलेली इमारत सुसज्य अशी आहे. दुमजली आरसीसी फ्रेम स्ट्रक्चरचे एकूण बांधकाम दोन हजार 148 चौरस मीटरचे आहे. या कामाकरिता सुमारे आठ कोटी 71 लाख 24 हजार 244 इतक्या रकमेस शासनाकडून तांत्रिक मान्यता प्राप्त झाली होती. या गोदामाच्या इमारतीमध्ये दोन स्टाँगरुम उभारले आहेत. तेथे चार हजार 224 मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्र सुरक्षीत ठेवता येणार आहेत, असेही सुखदेवे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अत्यंत विचारपूर्वक व दूरदृष्टीने आवश्यक असलेल्या गोदामाकरिता रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण तालुक्यातील शितोळे येथील जागेची निवड केली होती. हे ठिकाण जिल्ह्यातील सात मतदारसंघांना जोडणारे आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने आवश्यक असणार्या मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्र सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल आहे.