| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहरात आज सकाळ पासूनच ताशी 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू लागल्याने झाडांच्या फांद्या तुटून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर समुद्राला उधाण आले आहे. समुद्रात मोठ्या आणि जोरदार लाटा उसळत असल्याने किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
समुद्र किनाऱ्यावर अनावश्यक गर्दी करू नये, पर्यटकांनी सेल्फी किंवा समुद्राच्या अतिजवळ जाण्याचा मोह टाळावा, कारण भरतीच्या वेळी लाटांचा वेग आणि उंची अचानक वाढू शकते. हवामानातील बदलामुळे पुढील काही तास जोरदार वारे आणि उंच लाटा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच सुरक्षित ठिकाणी राहावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास संबंधित यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मुरूड शहरात जोरदार वारे! समुद्रकिनारी उंच उंच लाटा
