| रोहा | प्रतिनिधी |
केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘हर घर नल से जल’ या उद्दिष्टपूर्तीसाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्यातील अनेक गावे ,वाड्या वस्त्यांसाठी लाखो रुपयांचा निधी केंद्राने मंजूर केला आहे.पण या सर्व योजना जणूकाही आमच्या मुळेच मंजूर झाल्या आहेत हे दाखविण्यासाठी माजी पालकमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ,आमदार यांची श्रेय घेण्यासाठी चालू असलेली धडपड पाहून जिल्ह्यातील अन्य पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी नाराजी व्यक्त करत आहेत. राज्याच्या राजकारणात झालेले सत्तांतर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होत असलेल्या अशा उद्योगांमुळेच झाले आहे.पण यापासून कोणताही बोध न घेता जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर जिल्ह्यातील सर्व योजना केवळ आम्हीच मंजूर केल्या असल्याचे जनतेत दाखविण्यासाठी या योजनांच्या मंजुरी आदेशांच्या झेरॉक्स प्रती स्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री गटाच्या काही कार्यकर्त्यांनी दिली असून या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या योजनेतील सर्व कामे ओपन टेंडर माध्यमातून होणार आहेत आणि निधी केंद सरकारचा आहे.2023 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाने पाणी हे केंद्र सरकारचे धोरण आहे.पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींकडून वाहत्या गंगेत आंघोळ करत या योजनांचे मंजुरीचे पुण्य स्वतःच्या पदरात पाडून घेण्याच्या या प्रयत्नांमुळे नव सत्ताधारी गटात तीव्र नाराजी असल्याचे दिसून येत असून याचा राग भविष्यात प्रशासनावर निघणार असल्याचे दिसून येत आहे.