प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी
। रायगड । प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट काढताना प्रवाशांचा अनेक वेळा वाहकासोबत वाद होतो. सुट्टया पैशांवरून वाद होवू नये, यासाठी एसटी महामंडळाने डिसेंबर 2023 मध्ये डिजिटल पेमेंटला सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील रामवाडी वाहतूक नियंत्रक अंतर्गत असणार्या एसटी आगारांमध्ये या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढत आहेत. यामुळे दरमहा सुमारे दोन लाख रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होत आहे. तसेच वाहकाचे सुट्टे पैसे सांभाळण्याचे कामही हलके होत आहे.
सर्वत्र डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रवासी रोख व्यवहार करण्याऐवजी ऑनलाइन व्यवहार करणे पसंत करतात. एसटी महामंडळानेही डिजिटल व्यवहाराचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध केला आहे. प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोन पे, गूगल पे यांसारखी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाहकाकडील अॅड्राईड तिकीट यंत्रावरील क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य होत आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा सुट्ट्या पैशांवरून वाहकासोबत होणारा वाद संपुष्टात येऊ लागला आहे, असे रायगड वाहतूक नियंत्रक दीपक घोडे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात एसटीतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या तुलनेत यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणार्या प्रवाशांची संख्या कमी आहे. एसटी महामंडळातील सर्वच वाहकांकडे अॅड्रॉईड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र आहे. बहुतेक वाहकांना हे मशीन जलदगतीने व्यवस्थित हाताळता येत नाही. त्यामुळे वाहक प्रवाशांकडे रोख रकमेने तिकीट काढण्याचा आग्रह धरतात. तसेच यूपीआय पेमेंटबाबत प्रवाशांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. तसेच वाहकांना अॅड्रॉईड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र चालवण्याबाबत प्रशिक्षित करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.