दररोज बसमध्ये बिघाड
| पाली / वाघोशी | प्रतिनिधी |
सुधागडसह पेण तालुक्यातील डोंगरदरीत राहणाऱ्या नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनीच मानली जाते. शाळा, कॉलेज, ऑफिस, बाजारपेठ, दवाखाने या ठिकाणी जाण्यासाठी येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर एसटी वर अवलंबून असतात. परंतु, एसटी महामंडळाच्या निष्काळजी धोरणामुळे प्रवाशांच्या जीवितावर गंभीर संकट ओढावत आहे. दररोजच येथील डोंगराळ भागात प्रवासादरम्यान एसटमध्ये काहीना काही बिघाड होतच असतो. त्यामुळे येथील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुधागड सह पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असून येथील नागरीक दळणवळणासाठी पुर्णपणे एसटी बसवर अवलंबून असतात. शाळा, कॉलेज, ऑफिस, बाजारपेठ, दवाखाने या ठिकाणापासून दुरवर असल्यामुळे खासगी वाहनाने ये-जा करणे परवडण्यासारखे नसते. त्यामुळे एसटी ही त्यांची जीवनवाहीनीच झाली आहे. परंतु, तीच जीवनवाहीनी आता त्यांचा काळ बनतेय की काय, अशी भीती प्रवासी वर्गाच्या मनात बसत आहे. त्याला कारण म्हणजे पाली-महागाव-कवेला वाडी, पाली-घोडगाव-खेमवाडी, पेण-घोडगाव, पेण-खेमवाडी तसेच लगतच्या डोंगराळ मार्गांवर धावणाऱ्या एसटी बसेसमध्ये दररोज काहीना काही बिघाड होतच आहेत. चालू बसचा कधी ब्रेक फेल, क्लच प्लेट निकामी, टायर पंचर तर कधी ऑइल पाईप फुटणे अशा गंभीर घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे बस रस्त्यामध्येच थांबविण्याची नामुष्की चालकावर येते. परंतु, तीव्र चढ-उतार, खोल दऱ्या आणि वळणावळणाचे धोकादायक रस्ते अशा परिस्थितीत बस बंद पडणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी थेट खेळच, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. यापूर्वी स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि नियमित प्रवाशांनी अनेक वेळा महामंडळ प्रशासनाला औपचारिक निवेदन देत समस्या मांडल्या आहेत. परंतु, त्यावर प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे रोजचा बस बिघाड, विलंब, प्रवासातील भीती आणि असुरक्षिततेमुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
डोंगरपट्टीतील रस्ते दुर्घटनेचे केंद्र?
येथील डोंगरपट्टी भागातील रस्ते अरुंद असल्याने एखाद्या बसमध्ये बिघाड झाल्यास त्या किठाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवून वाहनांच्या मोठ्याचा मोठ्या रांगा लागतात. रात्रीच्या वेळी बस बंद पडल्यास प्रवाशांना अंधारात थांबावे लागते. विशेषतः महिला व विद्यार्थ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. काही ठिकाणी बस चढावर अचानक बंद पडल्यावर ती मागे घसरण्याचीही घटना घडली आहे. त्यामुळे ही मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देणारी परिस्थिती आहे. त्यामुळे महामंडळाने आमचा जीव धोक्यात घालणे बंद करावे. बसची तांत्रिक तपासणी वाढवावी, चालकांना योग्यवेळी बदलावे आणि जुन्या गाड्यांच्या ऐवजी नवीन व सक्षम बस द्याव्यात, अशी प्रतिक्रीया स्थानिकांसह प्रवासी वर्गातून उमटत आहेत.
चालक-वाहकांकडून असमाधानी उत्तर
प्रवाशांनी संबंधित चालक व वाहकांकडे तक्रार मांडल्यास त्यांच्याकडून असमाधानी उत्तर दिले जाते. ते सांगतात की, या सर्व गोष्टी आमच्या हातात नाहीत. तक्रार करायची असेल तर थेट अधिकाऱ्यांकडे जा. आम्हाला जे वाहन दिले जाते ते चालवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. अशा प्रतिक्रियेमुळे प्रवाशांचा रोष आणखीच वाढत आहे. जर चालक-वाहक असहाय असतील तर मग या परिस्थितीची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.
