नागरिक व पर्यटकांचे अतोनात हाल
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
किल्ले सुधागडकडे जाणार्या संपूर्ण रस्त्याची अवस्था दयनीय झालीय. या ठिकाणी पाच्छापुर, रामवाडी, आसनवाडी,पाच्छापुर दर्यागाव,पाच्छापुर ठाकूरवाडी, सोनारवाडी आदींसह गावे व आदिवासी ठाकूर वाड्या वस्त्या आहेत. जीवघेणे खड्डे, दगडगोटे, धूळ, खडी यामुळे अपघाती घटनांत वाढ होतेय. खडतर व धोकादायक रस्त्यामुळे रुग्ण, गर्भवती महिला, नागरिक व पर्यटकांचे अतोनात हाल होत आहेत व प्रवास व वाहतूक असुरक्षित झालीय. पाच्छापुर मार्गावर पडलेले खड्डे व खडी यामुळे वाहनात बिघाड होऊन वाहनचालकांच्या खिशाला नाहक कात्री बसत आहे. तसेच लहान मोठ्या वाहनात देखील बिघाड होत आहे.
खडतर रस्ते यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरतोय. येथील नागरीक व्यवसाय, कामधंदा, नोकरी व दुग्ध व्यवसायाच्या निमित्ताने पाली व इतरत्र जात येत असतात. विद्यार्थी देखील याच खाच खळग्याच्या मार्गावरून शाळा व महाविद्यालयात येजा करीत असतात. प्रवाशाना घेऊन येणार्या एसटी मध्ये अनेकदा बिघाड होतो. या मार्गाचे डांबरीकरण व मजबुतीकरणं करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
किल्ले सुधागड व पाछापूर कडे जाणार्या रस्त्याची पूर्णता चाळण झाली आहे. वर्षानुवर्षे या रस्त्याची दुरावस्था असून शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे रस्ता समस्येकडे दुर्लक्ष आहे. या खडतर मार्गावर डांबर कधी पडणार ?याची आम्हाला प्रतीक्षा आहे. आतातरी या मार्गाचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी स्थानिक नागरिक भीम महाडिक यांनी केली आहे.