विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यु

। भंडारा | वृत्तसंस्था |

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या एका सहा वर्षीय चिमुकलीला विजेचा धक्का लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत पहिल्या वर्गात शिकणार्‍या या विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना बुधवारी (दि.3) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यशस्वी सोपान राऊत (वय 6 वर्ष, रा.पुयार) असं या मृतक विद्यार्थिनीचं नावं आहे. शाळेच्या तिसर्‍याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र शोककळा पसरली असून राऊत कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विदर्भातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांना 1 जुलैपासून सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार सर्वत्र मोठ्या हर्ष उल्हासात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र नवीन शैक्षणिक सत्रातील तिसर्‍याच दिवशी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात शिकणार्‍या एका चिमुकल्या विद्यार्थिनीचा शाळेतच विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. दरम्यान, लाखांदूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Exit mobile version