| भंडारा | प्रतिनिधी |
सध्या पावसाने जोर धरला आहे. अशातच शेतकरी लावणीच्या कामात व्यस्त आहे. सर्वत्र लावणीची कामे सुरु आहेत. ग्रामीण भागात नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच भंडारामधील पवनी तालुक्यातील चिचाळा गावात शेतात भातलावणी सुरु असताना वीज कोसळून 20 महिला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्व महिलांवर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपासून विदर्भात सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर पुढचे काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र नागपूर व भंडारा जिल्ह्यात आणखी एक दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने या दोन जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. भंडाऱ्यात भातलावणी मोठ्या प्रमाणावर होत असते. भाताची लावणी सुरू असतानाच महिलांच्या अंगावर वीज कोसळली.