नागोठणे एसटी स्टँडवर विद्यार्थिनीचा विनयभंग

60 वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

। नागोठणे । प्रतिनिधी ।

परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा एसटी बसमध्ये चढताना विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नागोठणे एसटी स्टँडवर मंगळवारी (दि. 17) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नागोठणे येथील 60 वर्षीय आरोपी आजीम अहमदमिया मुजावर याला नागोठणे पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील पांडापूर येथील विद्यार्थिनी वरवठणे येथील एस.एस.ओ.एस.पी. डिप्लोमा कॉलेजमध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. मंगळवारी तिची सहामाही परीक्षा होती. सायंकाळी पाच वाजता पेपर संपल्यानंतर ती आपल्या मैत्रिणीसोबत नागोठणे एसटी स्टँडवर आली. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पेण-पाली-पेण या एसटी बसमध्ये चढत असताना बसला मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एस.टी. बसमध्ये चढण्यासाठी बाजूला उभ्या असलेल्या या व्यक्तीने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. पीडित मुलीने आरडाओरडा करत संबंधित व्यक्तीचा शर्ट पकडला. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणीने त्या व्यक्तीला पकडून थेट एसटी कंट्रोलरकडे नेले आणि तेथून नागोठणे पोलीस ठाण्यात हजर केले.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे नाव आजीम अहमदमिया मुजावर रा. हुजरा मोहल्ला, नागोठणे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडित मुलीने तिचे वडील आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत नागोठणे पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून नागोठणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा हे करीत आहेत.

Exit mobile version