फिरत्या भावार्थ वाचनालयात रमले विद्यार्थी

| माणगाव | प्रतिनिधी |

टीडब्लुजे माणगाव यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या भावार्थ चालतं फिरतं वाचनालयाच्या व्हॅनची दि.7 रोजी रा.जि.प. शाळा विकास कॉलनी शाळेत कवी, लेखक भा.रा. तांबे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‌‘गाव तिथं देवालय’ त्याचप्रमाणे 21 व्या शतकात ‌‘गाव तिथे वाचनालय’ या संकल्पनेतून भावार्थ वाचनालय ही राज्यभर फिरणारी बस, वाचनालय उपक्रम आहे. हे वाचनालय गाडी कशी असेल याबाबत विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी यांना कुतूहल व आकर्षण होते. सदर व्हॅनचे प्रमुख जयेश पवार यांनी पुस्तके का वाचावीत, कशी वाचावी, गाडीचे वैशिष्ट्य काय, पुस्तकांचे विविध प्रकार कोणते, यांच्याविषयी मार्गदर्शन केले. मुलांनी तब्बल दोन तास वाचनाचा व पुस्तके निरीक्षणाचा आनंद घेतला.

माणगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख गटशिक्षणाधिकारी सुनीता खरात यांनी चालत्या फिरत्या वाचनालयाचे कौतुक केले. विकास कॉलनी शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली शेळके, शिक्षिका कासे यांनी महाराष्ट्रभर फिरणाऱ्या या वाचनालयाचे स्वागत करून पुन्हा शाळेला भेट देण्याची विनंती केली व या उपक्रमाचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version