हटाळे शाळेतील शाळा प्रवेशोत्सव
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव केंद्राअंतर्गत येणारी नागाव हटाळे शाळेत सोमवारी(दि.16) शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, नागांवच्या सरपंच हर्षदा मयेकर, नागांवचे केंद्र प्रमुख प्राची ठाकूर, उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, हर्षदा गायकवाड, डॉ.संदीप वारगे, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या साक्षीने नवख्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आयुष्याची पहिली पायरी चढली.
शाळेत प्रवेश होताना विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पायाचे ठसे कुंकवाने कागदावर उमटविण्यात आले. त्यामुळे हे एक विशेष आकर्षण ठरले. ज्ञानाच्या या पवित्र दारी त्यांनी आपले स्वप्नांचे पहिले पाऊल टाकले. शाळेच्या दारात फुलांच्या पायघड्या आणि टाळ्यांच्या गजरात करण्यात आले. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर आणि पुस्तके वाटप करण्यात आली. नव्या कपड्यांमध्ये सजलेली ही छोटी पाखरं, जणू आपल्या आयुष्याचं नवीन पान उघडत होती.
यावेळी तहसीलदार विक्रम पाटील यांनी भाषणातून शिक्षणाच्या महत्वावर भर दिला. गावातील मुलांना मोठ्या स्वप्नांची प्रेरणा दिली.
यावेळी सरपंच हर्षदा मयेकर यांनी गावाच्या शिक्षणविकासासाठी नेहमी साथ देण्याचे आश्वासन देत शाळेच्या प्रगतीचे कौतूक केले. या प्रवेशोत्सवाने चिमुकल्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा एक वेगळा उत्साह दिसून आला. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात शाळेने मिळविलेल्या यशाबद्दल तसेच संदीप वारगे यांना मिळालेल्या ऑनररी डॉक्टरेट पुरस्काराबद्दल तहसीलदार विक्रम पाटील यांच्या हस्ते वारगे यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, डॉ. हर्षदा गायकवाड, मंडळ अधिकारी आगे, तलाठी राम घुगरे, केंद्रप्रमुख प्राची ठाकूर, आरोग्य सेविका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा जान्हवी घरत, लायन्स क्लबचे सदस्य निलेश नाईक, साक्षी कवाड अंगणवाडी मदतनीस तसेच असंख्य पालक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी भोपी, डॉ. संदीप वारगे, सीमा नागावकर, विजया माळी यांच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.







