स्वच्छ, सुंदर माणगांवसाठी विद्यार्थी सरसावले

नगरपंचायतीने राबविलेल्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

| माणगाव | वार्ताहर |

माणगांव नगरपंचायतीने हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानात विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व नागरिक शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी हातात झाडू, फावडे, कोयते घेऊन उतरले होते. त्यामुळे या उपक्रमाला सर्वस्तरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आपली स्वच्छता आपल्याच हाती हे ध्येय मनाशी बाळगलेल्या माणगावकरांनी स्वच्छतेसाठी कंबर कसली आहे. गाव करील ते, राव काय करणार या उक्तीचा अनुभव माणगाव नगरपंचायतीने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात पाहायला मिळाला. माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी माणगावकरांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचे आव्हान केले होते. त्या आव्हानाला माणगावकरांनी भरभरून प्रतिसाद देत 4 ऑगस्ट रोजी विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थासह शिक्षक शिक्षकेत्तर तसेच शासकीय कर्मचारी नागरिकांनी माणगाव स्वच्छ केले.

मे महिन्यापासून माणगाव नगरपंचायतीकडून प्रत्येक महिन्याला शहरातील 1 मार्ग घेऊन त्याचे 10 टप्पे करून स्वच्छता करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. यामध्ये 4 ऑगस्ट रोजी माणगांव तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा हमरस्ता म्हणजे कचेरी रोड कॉर्नर ते वाकडाई देवी मंदिर या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. या स्वछता अभियानात एकूण 526 विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी, अंगणवाडी सेविका, अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय, तहसीलदार कार्यालय , तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय, शाळांमध्ये टिकम भाई मेथा कॉमर्स कॉलेज, द.ग तटकरे कॉलेज (राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक) व विध्यार्थी, श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कुल, नूतन माध्यमिक विद्यामंदिर, एस. एस निकम इंग्लिश स्कुल, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान बैठक समिती श्री सदस्य, अशोकदादा साबळे विद्यालय विद्यार्थी, सेवाभावी संस्था, डॉक्टर आणि पंचायत समिती कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. यावेळी माणगाव प्रांत अधिकारी. डॉ. संदीपान सानप, तहसीलदार विकास गारुडकर, माणगांव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी श्री. जठार, तसेच सर्व आजी माजी नगरसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभियानात 150 शासकीय कर्मचारी अधिकारी, तर 526 स्वयंसेवी संस्था, नागरीक, विद्यार्थी असे 676 सदस्य सहभागी झाले होते. यावेळी साफ केलेल्या गटारांवर जंतुनाशकांची पावडर टाकण्यात आली. तसेच कचेरी रोड महेंद्र ज्वेलर्स ते वाकडाई मंदिर या भागात असणारी अनाधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतील स्वच्छता अभियान टप्पा नं. 3 मध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Exit mobile version