कुटुंबियांच्या उपस्थितीत कौतुक सोहळा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘आम्ही आगरी ग्रुप’कडून घरोघरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांचा सत्कार करण्यात आला.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून कर्जत तालुक्यातून त्या-त्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात आगरी समाजात प्रथम येण्याचा बहुमान मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला.
आम्ही आगरी ग्रुपकडून गेली काही वर्षे दहावीमध्ये आपल्या शाळेत प्रथम क्रमांक मिळविला असेल अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सन्मान केला जातो. पदाधिकाऱ्यांनी थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कौतुक सोहळा पार पाडला. घरातल्या हक्काच्या माणसांसमोर झालेला हा सन्मान पाहून विद्यार्थी आणि त्यांचे पालक भारावून गेले होते. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे केवळ त्यांचे नसून संपूर्ण कुटुंबाच्या कष्टाचे फळ आहे, ही भावना जपत आम्ही आगरी ग्रुपने हा अनोखा उपक्रम राबवला. आम्ही आगरी ग्रुपचे संदीप म्हसकर, अंकुश शेळके, मिलिंद विरले, शिवाजी कराळे, जनार्दन पवार, विलास डुकरे, किशोर घारे, केशव मुने, मनोहर हजारे, मनीषा दळवी, सुभाष नाईक, जयवंत हबळे, कैलास थेरं, महेश भगत, रवींद्र तरे, रामदास माळी, राज कराळे यांच्यासह समाजातील इतर मान्यवरांचा समावेश होता.
कर्जत तालुक्यात 97 टक्के गुण मिळवून यश मिळवणाऱ्या सायली शशिकांत मुंढे हिचा धामोते गावी जाऊन सन्मान करण्यात आला. त्याचवेळी भार्गवी तरे, जय मोडक, प्रेम ऐनकर, सोनाली शेळके, वैष्णवी मुने, मनाली मुने, दिव्या लोभी, सायली मुंढे, जागृती अगीवाले, ऋषभ शेळके, स्नेहल कराळे, संजीवनी धुळे, श्रेया स्नेहा मसने या गुणवंत विद्यार्थ्यांचा दहावी आणि बारावीमध्ये प्रथम क्रमांक आल्याने विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
