विद्यार्थ्यांनी विकासात्मक बदल घडवणे आवश्यक

ॲड. गौतम पाटील यांचे आवाहन जेएसएम महाविद्यालयाचा दीक्षारंभ सोहळा उत्साहात

| रायगड | प्रतिनिधी |

महाविद्यालयामधून अनेक चांगले विद्यार्थी घडतात. जे आपला ठसा कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा तसेच इतर विविध क्षेत्रात उमटवितात. महाविद्यालयात प्राध्यापक विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर, व्यावहारिक ज्ञानदानाचे कार्य करतात. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपला व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी केले.

जेएसएम महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम व बी.एस.सी.मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या दीक्षारंभ कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्या डॉ. सोनाली पाटील, दीक्षारंभ समिती प्रमुख डॉ. मीनल पाटील, विविध विषयांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि 325 विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मीनल पाटील यांनी केले. त्यामध्ये त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर डॉ. प्रवीण गायकवाड यांनी महाविद्यालयात सुरु असलेले विविध उपक्रम जसे की, एनएसएस, एनसीसी, डीएलएलई, क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग, करिअर गायडन्स सेल, महिला विकास कक्ष आणि इतर उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या जीवनात या उपक्रमाचे काय महत्त्व आहे, हे स्पष्ट केले.

Exit mobile version